चिखली : प्रशासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करून कॅन व बाटल्यांमध्ये इंधन विक्री केल्याप्रकरणी चिखली येथील एका पेट्रोलपंप मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत राहावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पेट्रोलपंपांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी विशेष आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच देणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, चिखली येथील जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंपावर २६ मार्च २०२६ रोजी खुल्या टाक्या व बाटल्यांमध्ये इंधन विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे आग किंवा अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन तहसील कार्यालय चिखली येथील पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात संबंधित पेट्रोलपंप मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ व २८७ अन्वये कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार कैलास गोपाळराव चाटारकर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की इंधन पुरेसा उपलब्ध असून घाबरून जाऊन किंवा विनाकारण साठवणूक करू नये. तसेच सर्व पेट्रोलपंप चालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.