Headlines

आनंदाच्या लग्नसोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; क्षणात उसळली भीतीची किंकाळी, ७ जखमी; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर (दिपक इटणारे ):- लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची सुरुवात… पण अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या एका लग्नसोहळ्यावर अचानक संकट कोसळले आणि आनंदाचे वातावरण क्षणात भीतीच्या सावटाखाली गेले. हजारो मधमाश्यांच्या थव्याने लग्नमंडपावर हल्ला चढवल्याने उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेत चार महिला व तीन पुरुष असे एकूण सात जण गंभीर जखमी झाले असून तिघांवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली.

अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिर परिसरात दाभाडी येथील चोपडे परिवारातील नवरी आणि धरणगाव येथील चौधरी परिवारातील नवरदेव यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता. सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते, पाहुण्यांची लगबग वाढत होती आणि मंडपात विधींची तयारी सुरू होती. नवरीला हळद लागल्यानंतर पुढील विधी सुरू झाले होते. लग्नमंडपात नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांची मोठी गर्दी होती. याच वेळी काही मधमाश्या मंडपात घोंगावताना दिसल्या. सुरुवातीला कुणालाच त्याचे गांभीर्य वाटले नाही. मात्र काही क्षणांतच जवळच्या झाडावरील पोळ अचानक तुटले आणि हजारो मधमाश्यांचा थवा थेट लग्नमंडपावर कोसळला. मधमाश्यांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिला, मुले आणि वृद्धांसह सर्वजण जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. काहींनी मंदिर परिसरातून बाहेर धाव घेतली, तर काहींनी झाडांच्या आडोशाला आसरा घेतला. या गोंधळात अनेकांना मधमाश्यांनी डंख मारले. दोन सख्ख्या भावांना तर मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणात डंख मारल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टरांनी उपचारादरम्यान एका जखमीच्या शरीरातून सुमारे हजार ते अकराशे तर दुसऱ्याच्या शरीरातून दीडशे ते दोनशे काटे काढल्याची माहिती मिळाली. इतक्या मोठ्या प्रमाणात डंख झाल्याने काही काळ त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण झाली होती.
या घटनेत रामकृष्ण हरी पाटील (७०), रवींद्र हरी पाटील (६५), अर्जुन नामदेव चौधरी (६०), सुशीलाबाई पुंजाजी चौधरी (७०), ज्योत्स्ना नारखेडे (३२) आणि मनीषा विजय नारखेडे (२९) यांच्यासह सात जण जखमी झाले. विशेष म्हणजे जखमींमध्ये नवरदेवाच्या वडिलांचाही समावेश आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने अनुराबाद येथील डॉ. गोपाल लीलाकर यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर सर्वांना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी तिघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले.
या घटनेत सुमारे २० ते २५ पाहुण्यांना मधमाश्यांचे डंख बसले असून काहींना किरकोळ दुखापत झाली. गावातील जाणकार नागरिकांनी त्यांच्या अंगातील काटे काढून प्राथमिक उपचार केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ लग्नसोहळा पूर्णपणे विस्कळीत झाला. भीतीचे वातावरण ओसरल्यानंतर पुढील विवाहसोहळा सोमेश्वर मंदिरावरून धरणगाव येथे हलविण्यात आला. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!