कर्नाटकच्या व्यापाऱ्याला मलकापूरात मारहाण करून लुटले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर : शहरात बाहेरगावाहून आलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बांबू खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी कर्नाटकातून आलेल्या व्यापाऱ्याला फसवून मोकळ्या मैदानात नेण्यात आले आणि त्याच्यावर हल्ला करून सुमारे दोन लाख रुपयांची लूट करण्यात आली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदविला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास मूर्ती नारायणस्वामी (वय ३२, रा. हेलेअळेगुंडी बंडा, जिल्हा चिकबळ्ळापूर, कर्नाटक) हे बांबू खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवहाराच्या निमित्ताने ते ६ मार्च रोजी मलकापूर येथे आले होते. दरम्यान काही व्यक्तींनी त्यांना माल दाखविण्याचे आमिष दाखवत रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे बोगद्याखालून मुक्ताईनगर मार्गावरील एम.एस.डब्ल्यू महाविद्यालयाजवळील मोकळ्या मैदानात नेले. रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी व्यापारी व त्यांच्या भावावर काठ्यांनी हल्ला केला. मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (अंदाजे ५६ हजार रुपये), ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल म्हणजेच एक लाख रुपये तसेच फोनपे द्वारे जबरदस्तीने ४० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. अशा प्रकारे एकूण १ लाख ९६ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची तक्रार श्रीनिवास नारायणस्वामी यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी निखिल संजय भोसले, प्रदीप सुरेश जैन, शाहरुख रहमान पिंजारे तसेच अन्य दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ११८(१), ११५(२) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे करीत आहेत. शहरात बाहेरगावच्या व्यापाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!