खामगाव : – पन्नास हजार रुपये दिल्यास पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका अभ्यासिका चालकाची फसवणूक करण्यात आल्याची घटना खामगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. आरोपींनी ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या नकली नोटांचे बंडल देऊन त्यांना लुबाडले. गणेश रविंद्र सोनवणे (वय २४, रा. गोकुळवाडी, औरंगपुरा, ज्योतिबा फुले चौक, छत्रपती संभाजीनगर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून ५० हजार रुपये दिल्यास ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले.
त्यानुसार ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता सोनवणे यांना खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे बोलावण्यात आले. येथे आरोपींनी त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले आणि त्याबदल्यात ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या नकली नोटांचे बंडल देऊन फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
