अवैध हातभट्टी दारूवर बुलढाणा ग्रामीण पोलिसांचा छापा; १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा : जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मितीला आळा घालण्यासाठी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत गोंधनखेड शिवारात सुरू असलेला हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या छाप्यात सुमारे १७ हजार २५० रुपयांचा मोहा सडवा, तयार दारू व साहित्य जप्त करण्यात आले असून वरवंड येथील ५१ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या हातभट्टी दारू तयार होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजताच्या सुमारास गोंधनखेड शिवारात पंचासमक्ष प्रोव्ही रेड करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपी गोविंदाहरलाल राठोड (वय ५१, रा. वरवंड, ता. जि. बुलढाणा) याच्या ताब्यातून मोहा व गूळ मिश्रित सडवा रसायनाने भरलेला निळ्या रंगाचा प्लॅस्टिक ड्रम (अंदाजे २५० लिटर) किंमत १२ हजार ५५० रुपये जप्त करण्यात आला. तसेच आंबट व उग्र वासाची अंदाजे १० लिटर गाळण केलेली हातभट्टी दारू तीन प्लॅस्टिक कॅनमध्ये आढळून आली, ज्याची किंमत सुमारे ३ हजार ३०० रुपये आहे. याशिवाय दारू गाळण्यासाठी वापरात येणारे टिनाचे दोन डबे, रबरी पाइप, लाकडी इंधन आदी साहित्य अंदाजे १ हजार ४०० रुपयांचे जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १७ हजार २५० रुपये इतकी आहे. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात कायमी अप. नं. २६/२०२६ अन्वये महाराष्ट्र मद्यबंदी कायद्यानुसार कलम ६५ (क), (फ), (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस हेकाँ. कैलास उगले यांनी तक्रार दिली आहे. सदरचा प्रोव्ही माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास उगले हे करीत आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध मद्यनिर्मितीवर पोलिसांची ही कारवाई ठरली असून अशा कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!