Headlines

५३व्या बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलचा प्रथम क्रमांक

मलकापूर:- मलकापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली असून नूतन इंग्लिश स्कूलने जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विज्ञान, नवकल्पना आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुरेख संगम साधत शाळेच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावून मलकापूरचे नाव उज्वल केले आहे.
विवेकानंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, हिवरा आश्रम येथे आयोजित ५३व्या बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्यातील विविध शाळांनी विज्ञान विषयातील अनेक नावीन्यपूर्ण मॉडेल्स सादर केली असताना नूतन इंग्लिश स्कूलच्या कु. गार्गी सागर शिकेतोड व कु. खुशी खानचंदानी यांनी सादर केलेले “प्लास्टिक पायरोलिसिस” हे मॉडेल विशेष आकर्षण ठरले.
प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्त इंधन निर्मितीचा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा हा प्रकल्प नावीन्यपूर्ण, पर्यावरणपूरक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्त असल्याने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, संशोधनात्मक मांडणी आणि प्रत्यक्ष उपयोगिता यांचा प्रभावी संगम या प्रकल्पात दिसून आला. या यशामागे विद्यार्थिनींचे अथक परिश्रम, मार्गदर्शक शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तसेच शाळा व्यवस्थापनाचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन कारणीभूत ठरले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच नूतन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सुरेश खर्चे सर, उपप्राचार्य अमोल चोपडे सर, प्रदीप कोलते सर, विज्ञान शिक्षक अमोघ घाटे सर, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!