मोताळा : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) तालखेड शिवारातील शेतात तयार करून ठेवलेली मक्याची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना ३ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास शालिग्राम अत्तरकर (रा. तालखेड) यांच्या गट क्र. ३२२ मधील चार एकर मक्याचे पीक नुकतेच सोंगवले होते. त्यानंतर त्यांनी शेतात सुड्या करून ठेवलेल्या होत्या. ३ मे रोजी सकाळी दोन सुड्या मशीनद्वारे काढण्यात आल्या असताना, मजुरांच्या जेवणाच्या वेळेत अत्तरकर यांच्या लक्षात आले की उर्वरित दोनपैकी एक सुडी पेटली आहे. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले आणि संपूर्ण सुडी जळून खाक झाली. या प्रकरणी कैलास अत्तरकर यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मधुकर महाजन आणि पोकॉ. रवींद्र नरोटे करीत आहेत.