मलकापूर : लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे, तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने लग्नास नकार देत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मलकापूर येथील ३८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश राजू टाक (वय ३५, रा. रामदेव बाबा नगर, मलकापूर) याने ५ ऑगस्ट २०२४ ते २५ मे २०२६ या कालावधीत तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. महिलेने विरोध करूनही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला असता आरोपीने लग्न करण्याचे, पत्नीला घटस्फोट देण्याचे तसेच तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून तत्काळ तक्रार केली नाही. त्यानंतरही आरोपीकडून वारंवार लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संबंधित महिला जवळपास तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार देत तिचा अपमान करून शिवीगाळ केली. तसेच तिला पैसे देण्याची तयारी दर्शविली. महिलेने पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. नं. ५६६/२०२६ अन्वये बीएनएसच्या कलम ६९, ३५६(२), ३५२ व ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि प्रशांत झेंडगे करीत आहेत.