Headlines

गौण खनीज प्रकरणात मोताळ्याचे लाचखोर नायब तहसीलदार रावळकर एसीबीच्या ताब्यात; मुरूम गाडीला परवानगी देण्यासाठी १४ हजारांची लाच मागितल्याचा आरोप

मोताळा (प्रतिनिधी) – गौण खनिज परवाना देण्याच्या मोबदल्यात १४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोताळा येथील नायब तहसीलदार कौतिकराव रावळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज दुपारी ताब्यात घेतले. ही कारवाई मोताळा तहसील कार्यालयात थेट करण्यात आली असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार नांदुरा तालुक्यातील असून त्याचा माती भरलेला ट्रक रावळकर यांनी पकडला होता. ट्रक सोडण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एकूण १४ हजार रुपयांची मागणी केली होती. यामध्ये चार हजार रुपये तातडीने आणि उर्वरित दहा हजार रुपये “हप्ता” म्हणून मागितले गेले होते. विशेष म्हणजे, याआधीही गेल्या महिन्यात रावळकर यांना एसीबीने सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशय आल्यामुळे त्यांनी लाच थेट स्वीकारली नव्हती. “माझ्याकडे नको, माझ्या माणसाकडे द्या,” असा संदेश त्यांनी तक्रारदाराला पाठवला होता. आज मात्र एसीबीच्या पथकाने अचूक डाव टाकत रावळकर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर लाच मागण्याच्या आरोपाखाली संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर रावळकर यांना बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!