नांदुरा :- तालुक्यातील वडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात ऋषिकेश शंकर खराटे (वय ४०, रा. माटोडा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता ऋषिकेश खराटे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ नांदुरा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि गणेश गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.