नांदुरा : नारखेड रोडवर २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या दरोडा प्रकरणी नांदुरा पोलिसांनी बुलढाणा कारागृहातून ताब्यात घेतलेला कुख्यात आरोपी कविन बाबु भोसले वय २५ रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर हा रविवारी दुपारी नांदुरा पोलिस ठाण्यातून पसार झाला. ही खळबळजनक घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. नांदुरा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे तपासी अंमलदार हे कॉ. अनंता वराडे यांनी पोलिस कोठडीतून सदर आरोपीस बाहेर काढून त्याचा जबाब नोंदवला आणि त्याला पुन्हा डी. बी. रूम मधून पोलिस कोठडीत नेत असताना पोलीसांच्या हाताला झटका देऊन पोलिस ठाण्याच्या मागच्या भींतीवरुन उडी घेऊन त्याने पळ काढला. पोलीसांनी त्याचा पाठलाग केला मात्र ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुरातून जिवाची पर्वा न करता त्याने जात पोलीसांच्या हातावर तुरी दिल्या.. या बाबत प्राप्त सविस्तर वृत्त असे की, २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री निमगाव नारखेड रोडवर दहा ते बारा जणांनी नागपूर येथील व्यापारी राजेंद्र कुमार प्रकाशचंद अग्रवाल व त्यांच्या मीत्राला अॅल्युमिनियम व कॉपरचा माल विकणे आहे असे आमीष दाखवून बोलावून घेतले आणि त्यांना मारहाण करून चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा ९ लाखाचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून काही आरोपींना अटक केली होती.