मलकापूर : धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात मलकापूर येथील ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाण्यात बुडाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कक्षसेविका अलका एकनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीवरून, २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३५ वाजण्यापूर्वी मौजे धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या पात्रात राजेश विठ्ठलसिंग राजपूत (वय ४८, रा. मलकापूर) यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे आणण्यात आला. वैद्यकीय तपासणीदरम्यान राजेश राजपूत यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी प्राप्त मेमोवरून मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग क्र. १६/२०२६ कलम १९४ बीएनएसएसप्रमाणे नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.