निमगाव रोहवाह : प्रवासादरम्यान काळाने घाला घातल्याने एका ५५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नारखेड-निमगाव मार्गावरील अवधा फाट्यादरम्यान १३ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. बजरंग आत्माराम पोलाखरे (वय ५५, रा. नांदुरा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग पोलाखरे हे बाहेरगावी सोयरीकसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. यावेळी बजरंग हे रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आले, तर त्यांची दुचाकी (क्र. एमएच २८ एएच ८६४८) जवळच पडलेली होती. त्यांना तातडीने ओमसाई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. मृताच्या पश्चात पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे.