Headlines

नांदुरा-मोताळा मार्गावर भीषण अपघात! कारची बैलगाडीला जोरदार धडक; ७० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, दोन बैल गंभीर जखमी

नांदुरा : शेतातील काम आटोपून बैलगाडीने घरी परतणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याच्या प्रवासाचा काळाने घात केला. भरधाव कारने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ७० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास नांदुरा-मोताळा मार्गावरील लोणवडी गावाजवळ घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात वासुदेव तुळशीराम कुटे (वय अंदाजे ७० वर्षे, रा. लोणवडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, वासुदेव कुटे हे शेतातील काम आटोपून बैलगाडीने घराकडे परतत होते. दरम्यान, याच मार्गाने जाणाऱ्या ब्रीझा कारने त्यांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बैलगाडीवरील वासुदेव कुटे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या धडकेत बैलगाडीचेही मोठे नुकसान झाले असून, बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नांदुरा येथील उल्हास फाउंडेशनच्या रुग्णवाहिका पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्वयंसेवक विलास निबोळकर, बलिराम गोड, प्रमोद वरदे, संजय चोपडे, साहेबराव फासे यांच्यासह इतरांनी मदतकार्य केले. मृतदेह नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. या घटनेमुळे लोणवडी गावावर शोककळा पसरली असून, एका वृद्ध शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *