Headlines

वरवट बकालमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन घरांना लक्ष्य, ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास

संग्रामपूर : गावात चोरट्यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी हात साफ करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. नवीन घराच्या पोर्चमध्ये ठेवलेला सोयाबीन व हळदीचा शेतीमाल आणि शेजारील भाडेकरूच्या घरातील रोख रक्कम, असा एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. वरवट बकाल येथे ११ नोव्हेंबर रोजी ही चोरीची घटना उघडकीस आली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर तुळशीराम रौंदळे (रा. वरवट बकाल) यांनी तामगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. रौंदळे यांनी गावात काही अंतरावर नवीन घर बांधले असून, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते घराची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी घराचे लोखंडी गेट उघडून अंगणात पाहणी केली असता पोर्चमध्ये ठेवलेले २ क्विंटल ४० किलो सोयाबीन, किंमत १४ हजार ४०० रुपये, तसेच २ क्विंटल २० किलो हळद, किंमत ३९ हजार ६०० रुपये, असा एकूण ५४ हजार रुपयांचा शेतीमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, याच परिसरातील दिनकर नामदेव राऊत यांच्या भाडेकरू अभिषेक गड यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. या घरातून २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान या दोन्ही चोऱ्या झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *