Headlines

भोसा घाटात काळाचा घाला! सोयाबीनचे भुस वाहून नेणारे ट्रॅक्टर उलटले; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

सिंदखेडराजा : दिवाळीच्या सणात आनंदाचे वातावरण असतानाच भोसा घाटात काळाने घाला घातला. सोयाबीनचे भुस वाहून नेणारे ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने त्याखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने एकाच गावातील दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली अनंतराव दवणे (वय २२) आणि महेश प्रकाश रणवीर (वय २०, दोघेही रा. केहाळवडगाव, ता. मंठा, जि. जालना) हे दोघे ट्रॅक्टरने सोयाबीनचे भुस धांदरवाडीकडे घेऊन जात होते. दरम्यान, भोसा घाटातील वळणावर अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या भीषण अपघातात ट्रॅक्टरवर असलेले दोघेही खाली फेकले जाऊन ट्रॅक्टरखाली दबले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनी ट्रॅक्टर बाजूला करून दोघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. ऐन दिवाळीच्या काळात घडलेल्या या घटनेने आनंदाच्या वातावरणावर दुःखाचे सावट पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी वरवंड पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
एकाच गावातील दोन तरुणांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने केहाळवडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *