मलकापूर : नातेवाईकांकडे गेलेल्या तरुणाला तेथून निघून जाण्यास सांगत वाद घालण्यात आला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, एका महिलेने हतोड्याने डोक्यावर वार केल्याने तरुण जखमी झाला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आकाश साहेबराव रावणचवरे (रा. बहापुरा, ता. मलकापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास ते मलकापूर येथील सुभाषचंद्र बोस नगरमध्ये नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी लक्ष्मी प्रकाश रावणचवरे (वय २३, रा. सुभाषचंद्र बोस नगर, मलकापूर) हिने त्यांना येथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर रूपाली सतीष वऱ्हाडे (रा. सुभाषचंद्र बोस नगर) हिने हातातील हतोड्याने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच सतीष वऱ्हाडे यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आकाश रावणचवरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध अप. नं. ६७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुनाल जाधव करीत आहेत.