संग्रामपूर : शेतात जाण्याच्या रोजच्या प्रवासात रस्त्यावर मृत्यू दबा धरून बसला असेल, याची कल्पनाही सावळा येथील शेतकरी सुभाष रामकृष्ण जाधव यांना नव्हती. झाडाची फांदी तुटून विद्युत तारांवर पडल्याने वीजप्रवाह सुरू असलेली तार रस्त्याच्या मधोमध पडली होती. याच तारेला दुचाकीवरून जाताना स्पर्श झाल्याने ४० वर्षीय सुभाष जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले सारंगधर सपकाळे गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सावळा येथील शेतकरी सुभाष रामकृष्ण जाधव हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीने शेताकडे जात होते. पाऊलवाटेने जात असताना रात्रीच्या सुमारास झाडाची फांदी तुटून विद्युत तारांवर पडली होती. त्यामुळे वीजप्रवाह सुरू असलेली तार रस्त्याच्या मधोमध पडली होती. मात्र, रस्त्यावर पडलेल्या या तारांचा अंदाज न आल्याने सुभाष जाधव यांचा दुचाकीवरून जात असताना तारेला स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले सारंगधर सपकाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने सावळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सुभाष जाधव यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, रस्त्यावर विद्युत तार पडून झालेल्या या दुर्घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, विद्युत तारांच्या देखभालीबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.