डोणगाव : शेतात राबून पिकांची राखण करण्यासोबतच दूध व्यवसायातून संसाराचा गाडा चालविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पशुधनावरच चोरट्यांनी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. डोणगाव परिसरात मागील दोन महिन्यांपासून मोटरसायकल, घरफोडी, म्हशी, शेळ्या, कृषीपंप व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक चोरीच्या घटनांची नोंद होऊनही ठोस तपास किंवा चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्यांचे अंदाजे दहा पशुधन चोरीला गेल्याची चर्चा असून, त्यासोबतच विविध शेती साहित्य आणि कृषीपंपावरील केबल चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. चोरीच्या घटनांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. विशेषतः दूध उत्पादन हा जोडधंदा असलेल्या शेतकऱ्यांची म्हैस किंवा अन्य पशुधन चोरीला गेल्यास त्यांच्या रोजच्या उत्पन्नावरच परिणाम होत आहे. गेल्या महिन्यात विष्णू जनार्दन पळसकर यांच्या दोन म्हशी गोठ्यातून चोरीला गेल्या. त्यानंतर पोळ्याच्या पूर्वसंध्येला गजानन साहेबराव पळसकर यांची एक म्हैसही गोठ्यातून चोरीस गेल्याची घटना घडली. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांनी डोणगाव पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप या चोरींचा तपास कुठपर्यंत पोहोचला, चोरट्यांचा शोध लागला का किंवा चोरीस गेलेले पशुधन कुठे आहे, याबाबत शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळालेली नाही. एकीकडे पावसाची अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि पिकांवरील संकट यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे चोरीच्या घटनांनी त्यांची चिंता आणखी वाढली आहे. कृषीपंप किंवा त्यावरील केबल चोरीला गेल्यानंतर नवीन साहित्य खरेदी करण्याची क्षमता अनेक शेतकऱ्यांकडे नाही. परिणामी सिंचनाची व्यवस्था विस्कळीत होऊन उभी पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरीच्या प्रकरणांचा तपास वेगाने करावा, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीस गेलेले पशुधन व शेती साहित्य परत मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, चोरीच्या घटनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.