Headlines

हॉटेलमध्ये जेवल्यानंतर ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मदीना हॉटेलची तपासणी करून अन्नाचे नमुने घेतले; त्रुटी आढळल्याने हॉटेल बंद करण्याचे निर्देश

मलकापूर : शहरातील वल्लीचौक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर ६५ वर्षीय इसमाची प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाल्याच्या तक्रारीने खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संबंधित हॉटेलची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने हॉटेल मालकाला नोटीस बजावून हॉटेल बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, कॉ. नारायणराव जाधव (वय ६५, रा. मलकापूर) हे ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वल्लीचौक परिसरातील हॉटेल मदीना येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतकाचे पुत्र सुरज नारायणराव जाधव यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देत, संबंधित हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आपल्या वडिलांची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला. तक्रारीची दखल घेत मलकापूर शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग, बुलढाणा यांना माहिती दिली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक मलकापूर येथे दाखल झाले. पथकाने हॉटेल मदीना येथे जाऊन अन्नपदार्थ, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच हॉटेलमधील इतर व्यवस्थेची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याचे सांगण्यात येत असून, विविध अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यानंतर संबंधित हॉटेल मालकाला नोटीस बजावून पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणात मलकापूर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल व अन्न नमुन्यांच्या तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.

अहवालाकडे सर्वांचे लक्ष

जेवणानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याच्या तक्रारीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र मृत्यू आणि हॉटेलमधील अन्नपदार्थांचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नसून, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा अहवालानंतर वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!