मलकापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या कार्यक्रमादरम्यान दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण करणारे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून, शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी पारपेठ प्रभागात ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एका युवकाने हिंदू समाजाला चिथावणी देणाऱ्या स्वरूपाच्या गाण्यावर हातात एके-४७ रायफलची प्रतिकृती असल्याप्रमाणे नक्कल करत कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत हिंदुस्थान प्रतिष्ठाणचे तसेच सामाजिक कार्यकर्ते ओम शिंदे यांनी संबंधित व्हिडीओवर कारवाई करण्याची मागणी केली होती. शहरातील गुप्तवार्ता यंत्रणा व स्थानिक पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांवर वेळीच कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, प्रकरणाची दखल घेत मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध २७ ऑगस्ट रोजी कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक कृत्य अथवा संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.