खामगाव : ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवहारात ग्राहकांकडून प्राप्त झालेली रोख रक्कम, नवीन व जुने ट्रॅक्टर तसेच हिशोबातील रक्कम परस्पर वापरून तब्बल २७ लाख ७४ हजार २०२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत पावत्यांचा भास निर्माण करून फसवणूक केल्याचाही आरोप असून, खामगाव शहर पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मलकापूर येथील विष्णू पांडुरंग तायडे (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेगाव रोडवरील महालक्ष्मी ऑटोकॉर्प प्रा. लि. येथे ट्रॅक्टर विक्रीचे व्यवहार सुरू असताना आरोपींनी संगनमत करून कंपनीच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, ग्राहकांकडून प्राप्त झालेली २ लाख ८४ हजार ५० रुपयांची रोख रक्कम, ८ लाख ५७ हजार रुपये किमतीचा नवीन ट्रॅक्टर, एक्स्चेंजमध्ये मिळालेले पाच ट्रॅक्टर (किंमत १२ लाख ७० हजार रुपये), एका ग्राहकाकडून जुन्या ट्रॅक्टरपोटी मिळालेले ७५ हजार रुपये, तसेच हिशोबातील २ लाख ८८ हजार १५२ रुपये, असा एकूण २७ लाख ७४ हजार २०२ रुपयांचा ऐवज स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय ग्राहकांना देण्यात आलेल्या कच्च्या पावत्या कंपनीच्या अधिकृत पावत्या असल्याचे भासवून ग्राहकांची तसेच कंपनीच्या संचालकांची फसवणूक आणि विश्वासघात केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश गुलाब शिरसाट (रा. रेल्वे कॉलनी, मलकापूर), प्रवीण तुकाराम बोचरे (रा. खुटपुरी, ता. खामगाव) आणि शिवशंकर तुळशीराम मानकर (रा. टेंभुर्णा, ता. खामगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६, ३१८(४), ३३६(३), ३४०, ३४४ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास खामगाव शहर पोलिस करीत आहेत.