खामगाव : शेतात काम करीत असलेल्या दोन महिलांवर अचानक रानडुकराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजता तालुक्यातील कोलोरी शिवारात घडली. या हल्ल्यात दोन्ही महिला जखमी झाल्याने शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, यशोदा मारुती गुधदे (६५) आणि रंजना दुर्योधन सिरसाट (४८), दोघी रा. कोलोरी, या शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. हल्ल्यात दोघींनाही दुखापत झाली. घटनेनंतर त्यांचे नातेवाईक आदित्य सिरसाट यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दोन्ही महिलांवर खामगाव सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३ मध्ये उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून परिसरातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व महिला मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या परिसरात पाहणी करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.