मलकापूर : तालुक्यातील खडकी शिवारात शेतजमिनीच्या मालकीच्या जुन्या वादातून एका महिलेसह तिच्या दोन मुलींवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विळ्याने वार करून मारहाण करण्यात आल्याने तिघी जखमी झाल्या असून, या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कल्पना अनंता निंबाळकर (वय ३६, रा. क्रांती कॉलनी, बोदवड, जि. जळगाव) यांच्या पतीने जून २०२५ मध्ये खडकी शिवारातील गट क्रमांक १७ मधील दोन एकर शेतजमीन खरेदी केली होती. हीच जमीन स्वतःला मिळावी, अशी आरोपींची इच्छा होती. मात्र जमीन निंबाळकर कुटुंबाच्या नावे विकली गेल्याने आरोपींनी मनात राग धरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. २१ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कल्पना निंबाळकर या आपल्या मुली भाग्यश्री (१८) आणि रीना (१३) यांच्यासह शेतात काम करत असताना सुनीता विनोद निकम, तुषार विनोद निकम आणि लक्ष्मी विनोद निकम (सर्व रा. खडकी, ता. मलकापूर) तेथे आले. शेताच्या मालकीवरून वाद घालत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तुषार निकम याने हातातील विळ्याने कल्पना निंबाळकर यांच्या डाव्या हाताच्या बोटांवर वार केल्याचा आरोप आहे. आईला वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या भाग्यश्री आणि रीना यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच घटना मोबाईलमध्ये चित्रीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाग्यश्रीच्या हातातील मोबाईल दगडावर आपटून फोडण्यात आला. यावेळी संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर कल्पना निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.