वीजेच्या तडाख्यात शेतकऱ्याची बैलजोडी दगावली; ७० हजारांचे नुकसान, खामगांव तालुक्यातील घटना!

खामगाव:- मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असताना खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथे दुर्दैवी घटना घडली. शेतकरी संजय लक्ष्मण गव्हाणे यांच्या गोठ्यावर वीज कोसळल्याने त्यांची बैलजोडी जागीच दगावली असून या घटनेत सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात २२ व २३ जून रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा पाऊस असला तरी काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानही झाले. किन्ही महादेव (ता. खामगाव) येथे २२ जून रोजी सायंकाळच्या सुमारास गव्हाणे यांच्या गोठ्यावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत गोठ्यात बांधलेली बैलजोडी मृत्युमुखी पडली. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतीच्या कामांसाठी महत्त्वाची असलेली बैलजोडी गमावल्याने कुटुंबावर संकट ओढावले आहे. दरम्यान, जिल्ह्यात २३ जून रोजी विविध भागात पावसाची रिमझिम सुरू असली तरी अन्य कोणतीही मोठी हानी झाल्याची नोंद नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!