मेरा बु. : गावातील मुख्य चौकातील बसस्टॉपजवळ असलेल्या विहिरीत ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
अंढेरा पोलीस सूत्रांकडून व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव बिस्मिल्लाबी मोहम्मद हनिफ (वय ६५, रा. मेरा बु.) असे आहे. त्यांची मुले व सुना उच्चशिक्षित असून संभाजीनगर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. बिस्मिल्लाबी या मुलांकडे राहत होत्या; मात्र गेल्या आठ दिवसांपासून त्या पतीसोबत मूळ गावी मेरा बु. येथे वास्तव्यास आल्या होत्या. दरम्यान, २२ जून रोजी सकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास गावातील मुख्य चौकातील बसस्टॉपजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावचे कोतवाल सचिन पडघान यांनी संबंधित विभागाला कळविले. त्यानंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे, दुय्यम ठाणेदार घुगे, पोलीस कर्मचारी फुसे, किशोर जाधव यांच्यासह गावकरी व पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. वृद्ध महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून आत्महत्या की घातपात, याबाबत गावात चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.