तालसवाड्यात दिवसाढवळ्या घरफोडी; १.४० लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास

मलकापूर : तालुक्यातील तालसवाडा येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, तालसवाडा येथील रहिवासी गोपाल प्रल्हाद चौधरी (वय ४५) हे १६ जून रोजी सकाळी घराबाहेर गेले होते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले (किंमत ४० हजार रुपये), ३ ते ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले (किंमत ३५ हजार रुपये), ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (किंमत ३० हजार रुपये), ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ३० हजार रुपये) तसेच ५ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अप. क्र. ८२/२०२६ नुसार कलम ३३१(३) व ३०५(ए) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय टेकाडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!