अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे.
खामगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दादाराव वानखडे (वय ३५, रा. महाळुंगी, ता. नांदुरा) हे दुचाकीने प्रवास करीत असताना कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी मृताचे भाऊ शिवाजी दादाराव वानखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!