Headlines

मलकापुरात जनआक्रोश मोर्चाने पालिका प्रशासन हलले; चार महिन्यांत पाणीप्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन!

मलकापूर :- शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नाने संतप्त झालेल्या नागरिकांचा संयम अखेर संपला असून, सोमवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून नगर परिषद कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. “आम्हाला पाणी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
शहरातील विविध भागांत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चानंतर नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले. शहरातील गळतीग्रस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती, अवैध नळजोडण्यांवर कारवाई, पाणीपुरवठ्याचे शास्त्रीय नियोजन आणि सर्व भागांना समान पाणीवाटप करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी अनेक नागरिकांनी पाणीटंचाईमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याची व्यथा मांडली. महिलांनी आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले, तर युवकांनी पाणीटंचाईमुळे सामाजिक अडचणी निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली.
दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनांवर समाधान न मानता लवकरच ठोस निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!