निवडणुकीच्या जुन्या वैमनस्यातून युवकावर जीवघेणा हल्ला; सहाजणांविरुद्ध गुन्हा

नांदुरा : नगर परिषद निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जुन्या राजकीय वैमनस्याचा राग मनात धरून एका २८ वर्षीय युवकावर बंदूक, तलवार व चाकूसारख्या घातक शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदुरा शहरातील कुरेशीनगर परिसरात घडली. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शाहीद शेख चांद कुरेशी (वय २८, रा. कुरेशी नगर, नांदुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख साजीद शेख इमाम, शेख फैजान शेख शकील, शेख रियाज शेख मुनाफ, शेख रहमान शेख गफूर, शेख इम्रान शेख इमाम आणि शेख फारुख शेख रसूल (सर्व रा. कुरेशी नगर, नांदुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नगर परिषद निवडणुकीत फिर्यादीने आरोपींच्या विरोधात काम केल्याने आरोपींच्या मनात त्याच्याविषयी राग होता. ५ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कुरेशीनगर येथील सैय्यद साहाद मशिदीजवळ शेख शाहीद उभा असताना आरोपींनी त्याला अडवून वाद घातला. त्यानंतर काही आरोपींनी मुठीने डोक्यावर वार करत मारहाण केली, तर इतरांनी लाथाबुक्क्यांसह तलवार व चाकूसारख्या शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ३७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३, ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!