खामगाव : – तालुक्यातील बोरी अडगाव येथे बैलगाडीला बैलजोडी जुंपत असताना बैलाच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम वामन टिकार (वय ७५) हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलगाडीला बैलजोडी जुंपण्याचे काम करत होते. त्याचवेळी गावातील एक मोकाट गाय अचानक तेथे आली आणि बैलांच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे बैल बिथरले आणि त्यांनी जोरात हालचाल केली. यावेळी बैलाचे शिंग शांताराम टिकार यांच्या अंगाला जोरात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे टिकार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.