Headlines

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक; पती-पत्नी गंभीर जखमी, मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर :- शहरातील बुलढाणा रोडवरील गोडे कॉलेजसमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बाळू कोळी (वय २७, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हे आपल्या पत्नीसह बाबा सैलानी यांचे दर्शन घेऊन दुचाकीने घरी परतत होते. ४ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ते गोडे कॉलेजसमोरून मलकापूरकडे येत असताना समोरून येणाऱ्या एमएच ३० बीएल ७८८९ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात संदीप कोळी यांच्या कंबरेला गंभीर दुखापत होऊन डाव्या बाजूचा बॉल फ्रॅक्चर झाला आहे. तसेच त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जळगाव येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी २२ मे रोजी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!