खामगाव : कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या चौघांनी पेट्रोल पंपावर तलवार व कोयता दाखवत दहशत माजविली. यावेळी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव-अकोला मार्गावरील के. के. पेट्रोल पंपावर २१ मे रोजी रात्री अमोल जाधव व त्याच्यासोबत एक युवक कॅनमध्ये पेट्रोल घेण्यासाठी आले होते. मात्र पंपावरील पेट्रोलचा साठा मर्यादित असल्याने कॅनमध्ये पेट्रोल देता येणार नसल्याचे पंप व्यवस्थापक सागर अवचार यांनी सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळानंतर अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव व आणखी एक अनोळखी इसम (सर्व रा. हिंगणा कारेगाव) हे हातात तलवार व कोयता घेऊन पेट्रोल पंपावर आले. त्यांनी अश्लील शिवीगाळ करत कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी देत पंप परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी पंप व्यवस्थापक सागर अवचार यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम 4/25 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी किरण राऊत करीत आहेत.