खामगाव : शहरातील तायडे कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व चांदीचे दागिने असा तब्बल ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाफीउर रेहमान अब्दुल रेहमान शेख (वय ७३), सेवानिवृत्त शिक्षक, रा. तायडे कॉलनी, खामगाव हे ४ मे रोजी कुटुंबासह नातेवाईकांकडे औरंगाबाद येथे गेले होते. याच दरम्यान ४ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ६ मे रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून २४ हजार ५०० रुपये रोख रक्कम, पाच चांदीच्या अंगठ्या किंमत ८ हजार रुपये तसेच दोन चांदीचे शिक्के किंमत ३ हजार रुपये असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात कायम अप. नं. २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.