भरधाव अॅक्टिवाची धडक; भोरसी गणेश मंदिरासमोर वृद्ध ठार

खामगाव : जलंब-खामगाव मार्गावर भरधाव अॅक्टिवा स्कुटीने दिलेल्या जोरदार धडकेत एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना १६ मे रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास भोरसी गणेश मंदिरासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टिवा स्कुटी क्रमांक एमएच २८ एडब्ल्यू २०९३ चा चालक सुधाकर देवीदास वाघमारे (रा. वाडी, खामगाव) हा वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. दरम्यान, त्याने मनोहर गंगाधर पाटील (वय ६५, रा. समतानगर, अकोला) यांना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात मनोहर पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच आशा संजय पाटील (रा. समतानगर, अकोला, ह.मु. सिडको, नाशिक) या जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी आशा पाटील यांच्या फिर्यादीवरून जलंब पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) व २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!