मलकापूर : शहरातील बसस्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे सातत्याने हात साफ करत असून, अद्याप एकाही सराईत चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी मलकापूर बसस्थानकात एका महिलेच्या पर्समधून तब्बल १ लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सौ. शिल्पा संजय पठ्ठे (वय ३२, रा. मातामहाकाली नगर, मलकापूर, ह.मु. चांडक ले-आऊट, बुलडाणा) या आपल्या कुटुंबासह बुलडाण्याकडे जाण्यासाठी मलकापूर बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढण्याच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चैन उघडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये दीड तोळ्याची सोन्याची पोत, काळ्या मण्यांची सोन्याची पोत तसेच सोन्याचे टॉप असा एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज होता. घटना लक्षात येताच महिलेने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांकडे मदत मागितली तसेच एसटी डेपो व्यवस्थापकांकडे अनाऊन्समेंट करण्याची विनंती केली. दरम्यान, मलकापूर बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून चोरी, पाकीटमारी आणि महिलांच्या पर्समधील ऐवज लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे. बसस्थानक परिसरात पोलिसांची गस्त आणि सीसीटीव्ही नियंत्रण असूनही चोरटे बिनधास्तपणे वारंवार गुन्हे करत असल्याने “पोलिसांचा धाक संपला का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, संशयितांवर लक्ष ठेवणारे पथक आणि प्रभावी कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.