खामगाव :- तालुक्यातील पिंप्री गवळी येथे चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत सुमारे २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शक्तीसिंह प्रकाशसिंह तोमर (वय ४१) हे १० एप्रिलच्या रात्री कुटुंबीयांसह घराच्या हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी बाहेरून खिडकीतून घरात प्रवेश करून पाहणी केली असता, बेडरूममधील कपाटे उघडी असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.