संग्रामपूर : कवठळ रस्त्यावर रात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना ५ एप्रिलच्या मध्यरात्री उशिरा घडली. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एक आरोपी सध्या अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष तुळशीराम आखरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मुळे हे पेट्रोलिंग वाहनासह रात्री गस्तीवर होते. दरम्यान कवठळ शिवारात गुप्तधन शोधणारी टोळी आल्याची माहिती त्यांना मोबाईलवरून मिळाली. त्यानुसार दोन्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले; मात्र तेथे कोणीही आढळून आले नाही. यानंतर परत येत असताना कवठळ रस्त्यावर आरोपी राजेश गव्हाळे (वय ४२) व मनोज गव्हाळे (वय ३८) यांनी पोलिसांना रस्त्यात अडवले. त्यानंतर दोघांनीही पोलिसांशी नाहक हुज्जत घालत अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हातातील स्टीलच्या कड्याने दोन्ही पोलिसांच्या कपाळावर मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी पोलीस हवालदार संतोष आखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात आरोपी राजेश गव्हाळे व मनोज गव्हाळे यांच्याविरुद्ध अपराध क्र. ११६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.