मेहकर :- तालुक्यातील हिवरा आश्रमजवळील रायपूर परिसरात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.8 ) सकाळी घडली. या घटनेत सुमारे 25 ते 30 जण जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील हभप. विठ्ठल महाराज काळे यांचे 27 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त कुटुंबीय व नातेवाईक पैनगंगा नदीकाठी धार्मिक विधीसाठी गेले होते. विधी सुरू असतानाच परिसरातील आग्या मोहोळावरील मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. यात जगन्नाथ काळे, उमेश काळे, सत्यभामा काळे, वसंता बुंधे, पंचफुला काळे, मारुती काळे, उकंडा काळे, वंदना काळे, वैभव काळे, सखूबाई काळे, अन्नपूर्णा काळे, वेदांत काळे, शारदा काळे, कुशीवर्ता काळे, रामदास वाहेकर यांच्यासह अनेकजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कचऱ्याचा धूर करून मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवून उपचारासाठी हिवरा आश्रम येथील दोन तर जानेफळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.