मलकापूर :- रेल्वे स्टेशनवर सोमवारी संध्याकाळी क्षणभरासाठी भीषण दुर्घटनेचे सावट निर्माण झाले. नागपूरकडे जाणाऱ्या एका मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरून घसरल्याने स्टेशन परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी दुर्घटना टळली. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सायं. पाचच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक पथके आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रुळांबाहेर गेलेले डबे स्पष्टपणे दिसत असून त्यांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारांना व्हिडिओ व फोटो घेण्यास रेल्वे पोलिसांनी विरोध करत बाहेर काढल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे डबे नेमके का घसरले? तांत्रिक त्रुटी की काही वेगळे कारण? याबाबत अधिकृत माहिती न देण्यात आल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. माध्यमांना दूर ठेवण्याच्या भूमिकेमुळे रेल्वे प्रशासन काहीतरी दडपण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे. या घटनेमुळे काही काळ प्लॅटफॉर्मवरील रेल्वे हालचाल विस्कळीत झाली. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांना उशीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे वाहतूक काही प्रमाणात प्रभावित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.