मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरातील भारत गॅस एजन्सी समोरील एका बालरोगतज्ज्ञाच्या हॉस्पिटलमध्ये काल रात्री एक घडलेल्या घटनेमुळे मलकापूरातील नागरिक संतप्त आहेत. रुग्णसेवा ही पवित्र भावना म्हणून ओळखली जाते पण येथे मात्र सेवेच्या नावाखाली पैशांचा आणि अहंकाराचा नाच सुरू असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
काल रात्री सुमारे नऊच्या सुमारास एका महिलेने आपल्या लहान मुलीला कफ झाल्यामुळे उपचारासाठी त्या हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्ण तपासणीदरम्यान डॉक्टरांनी विचारले, किती दिवस झाले कफ आहे? महिलेने शांतपणे उत्तर दिले, आठ दिवस झाले, त्यावर डॉक्टरांनी अत्यंत उद्धट स्वरात उत्तर दिले आठ दिवस झाले आणि आता एवढ्या रात्री डॉक्टरांना त्रास द्यायला आलात का ? या शब्दांनी त्या महिलेचा अपमान झाला, आणि उपस्थित नातेवाईक थक्क झाले. डॉक्टरांकडून अशी वागणूक अपेक्षित नसते. अखेर, हा डॉक्टर काही फुकट उपचार करत नाही; तो आपली फी घेतोच ना? मग रुग्ण आणि त्यांचे पालक हे उपकारार्थी नव्हेत तर ग्राहक आहेत. आणि ग्राहकांशी अशा प्रकारे वागणं हे आरोग्य क्षेत्राला काळिमा फासणारं आहे. मलकापूरातील या डॉक्टराने काही वर्षांपूर्वी केवळ दोन खोल्यांतून उपचार सुरू केले होते. पण आज मोठं, थाटात उभारलेलं हॉस्पिटल त्याचं सेवेचं प्रतीक म्हणून नव्हे, तर स्वतःच्या प्रसिद्धीचं स्मारक झालं आहे. उद्घाटनावेळी देवदर्शनासारखं वातावरण तयार केलं गेलं, पण खरी सेवा आणि विनम्रता मात्र दारातच राहिली. रुग्णांशी नम्रपणे वागणं ही डॉक्टरकीची पहिली अट असते. पण इथे रुग्णांच्या भावनांशी खेळ केलं जातं. ‘मी डॉक्टर आहे’ या अहंकारात मानवतेचं भानच हरवलं आहे. डॉक्टरकी म्हणजे केवळ ज्ञान आणि फी नव्हे, तर करुणा आणि संयम यांचं मिश्रण असावं लागतं पण या डॉक्टरच्या वागणुकीत करुणेचा पत्ताही नाही. अनेक महिला आपल्या मुलांसाठी योग्य उपचार मिळावेत या हेतूने अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करतात. पण त्यामुळे अशा डॉक्टरांचा अहंकार अधिक वाढतो. महिलांशी उद्धट बोलून आपलं श्रेष्ठत्व दाखवण्याची ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. समाजात आज डॉक्टरांविषयी असलेला आदर टिकवायचा असेल, तर अशा वागणुकीवरच आधी उपचार करायला हवेत. डॉक्टरकी हे एक पवित्र व्यावसाय आहे, पण काहींनी त्याला व्यवहार बनवलं आहे. रुग्णांच्या पैशातून उभारलेलं भव्य हॉस्पिटल हे अभिमानाचं नव्हे, तर लाजिरवाणं प्रतीक ठरतं, जेव्हा त्याच्या भिंतींआड उद्धटपणा आणि अपमानाचा आवाज घुमतो. “ग्राहक देव असतो” असं म्हणतात, पण इथे देवाशीच तुच्छतेने बोललं जात आहे. डॉक्टरांचं काम म्हणजे रुग्णाला बरे करणं, त्याचा अपमान करणं नाही. आज तो मोठं हॉस्पिटल उभारून अहंकार दाखवतो आहे, पण अहंकाराचा शेवट नेहमी विनाशातच होतो. रावणाचाही झाला, तर हा कुठं टिकणार? विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा पण इथे रुग्णांच्या आई-वडिलांसाठीच अडथळे उभे राहतात. रुग्णसेवेचं स्थान मंदिरासारखं असतं; पण या हॉस्पिटलच्या भिंतींआड देव नव्हे, अहंकारच विराजमान झाल्याचं चित्र नागरिकांत दिसत आहे. म्हणायला विघ्नहर्ता, पण वागणूक पाहिली की विघ्न देणारा वाटतो, अशी टिप्पणी एका पालकाने केली.