Headlines

अंढेरा परिसरात अवैध धंद्यांचा उघडपणे धुमाकूळ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांचे निवेदन!

अंढेरा :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार वर्षांपासून अवैध दारू विक्री, मटका, वरली, हातभट्टी, आणि वाळू वाहतुकीसारखे गैरकृत्य उघडपणे सुरू असून, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते कार्तिक खेडेकर आणि विठ्ठल खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसून, उलट हे अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत आहेत. गावकऱ्यांनी पोलिस कर्मचारी सिद्धार्थ सोनकांबळे यांच्यावर या अवैध व्यवसायांना पाठींबा देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्या तात्काळ बदली अथवा बडतर्फीची मागणी जोर धरू लागली आहे. महत्वाचे म्हणजे, या अवैध धंद्यांमुळे महिलांना तसेच शाळकरी मुलींना नशेत असलेल्या लोकांचा त्रास सहन करावा लागत असून, दारू पिऊन वाहन चालवण्याच्या घटनांमुळे अपघातांमध्येही वाढ झाली आहे. काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.

गावकऱ्यांनी आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत उद्भवणाऱ्या परिणामांसाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या निवेदनामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासन पुढे काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!