मलकापूर( दिपक इटणारे ) :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशांचे वाटप अद्याप झालेले नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटूनही गणवेश उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळेत येत आहेत.
गणवेश वाटप ही योजना शिक्षणातील समानता व शिस्तीला चालना देण्यासाठी शासनाने राबवली आहे. मात्र, यंदा निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे गणवेश वाटप रखडले आहे. दरवर्षी जून महिन्यातच गणवेश शाळांमध्ये पोहोचत असतो, पण यंदा उशीर झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गणवेश न मिळाल्याने शाळेतील एकसंधतेच्या भावनेला बाधा पोहोचली आहे. शाळेच्या उपक्रमांमध्ये गणवेशाच्या अनुपस्थितीमुळे शिस्त राखण्यास अडचण निर्माण होत आहे. शिवाय, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठीही विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळणार का, याविषयी संभ्रम आहे. शासनाच्या निविदा प्रक्रियेत दिरंगाई झाल्यामुळे वितरकांची नेमणूक उशिरा झाली आहे, परिणामी गणवेश तयार करण्याची व वितरणाची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये हीच परिस्थिती असल्याचे समजते. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळण्यासाठी शाळा प्रशासन आणि पालक वर्ग अपेक्षेने वाट पाहत आहेत. गणवेश लवकर उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.म
लकापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये गणवेशाचे वाटप झाले आहे तर काही शाळांमध्ये सुरू आहे. तीन ते चार दिवसांमध्ये गणवेश वाटप प्रक्रिया पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्नशील आहोत
एन.जे. फाळके
गट शिक्षण अधिकारी