मलकापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी ट्रक डिझेल टँक वेल्डिंग दरम्यान भीषण स्फोट झाला. या अपघातात वेल्डर शेख रहीम शेख अजीज (वय ५५, रा. मलकापूर) गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे हलवण्यात येत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. शाहरुख जाफर पटणे (रा. जामनगर, गुजरात) यांनी ट्रक (क्रमांक जी.जे. १० झेड ७०९०) डिझेल टँक लिकेजमुळे दुरुस्तीसाठी मलकापूरजवळील अताउल्लाखान रशिदखान यांच्या गॅरेजमध्ये आणला होता. वेल्डिंग करताना अचानक स्फोट झाला. स्फोट इतका प्रचंड होता की शेख रहीम यांचा एक पाय तुटून जागीच पडला तर दुसरा पाय पूर्णतः निकामी झाला.
या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली होती.आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशिल तायडे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तत्काळ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
रुग्णवाहिकेतून नेत असताना घोडसगाव चिखलीजवळ त्यांचा मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.