मुक्ताईनगर :- शहरातील प्रवर्तन चौकात १९ डिसेंबरच्या रात्री चाकूहल्ल्याचा थरारक प्रकार घडला. अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत व्यापारी मंगेश खेवलकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मंगेश खेवलकर, त्यांचा भाऊ रवींद्र आणि वडील रमेश खेवलकर हे दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या जवळ येत अचानक चाकूने हल्ला केला. हल्ल्यात पिता आणि दोन्ही पुत्र गंभीर जखमी झाले.हल्ल्यामुळे मंगेश खेवलकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. रवींद्र आणि रमेश यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुक्ताईनगर पोलिसांनी हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर विना नंबरप्लेटच्या वाहनातून आले होते, यावरून तपासाला गती देण्यात आली आहे.या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा हल्ला नेमका का करण्यात आला, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुकान बंद करत असताना व्यापारी कुटुंबावर चाकूहल्ला, एकाची प्रकृती गंभीर; मुक्ताईनगर शहरातील घटना!
