नांदुरा : शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नांदुरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवित अवघ्या २४ तासांत मध्यप्रदेशातील खंडवा येथून मुलीचा सुखरूप शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासामुळे मुलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या या तत्पर व प्रभावी कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.
नांदुरा येथील संबंधित अल्पवयीन मुलगी शाळेत जात असल्याचे सांगून शालेय गणवेश व दप्तरासह सकाळी घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. वडिलांनी शाळा, मैत्रिणी तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला; परंतु तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा (अपराध क्र. ५०५/२०२६) दाखल करण्यात आला. तक्रार मिळताच नांदुरा पोलिसांनी तपासाला वेग दिला. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष शोध पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी नांदुरा, मलकापूर आणि भुसावळ रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. या तपासात मुलगी नांदुरा रेल्वे स्थानकावरून तिकीट घेऊन भुसावळपर्यंत गेल्याचे तसेच तेथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. पोलिसांचे पथक मध्यप्रदेशातील खंडवा येथे पोहोचले. तेथे एका मंदिरात संबंधित अल्पवयीन मुलगी आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नांदुरा येथे आणले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला सुखरूपपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी दाखविलेली तत्परता, तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर आणि अवघ्या २४ तासांत केलेली कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. मुलगी सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, पोलिसांच्या कार्यतत्परतेबद्दल कुटुंबीयांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले. या कारवाईबद्दल नांदुरा पोलिसांच्या पथकाचे कौतुक होत असून, अडचणीच्या प्रसंगी पोलिस यंत्रणा नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचा विश्वास या कारवाईमुळे अधिक दृढ झाला आहे.