Headlines

घरातच साठवला होता गांजा; चिखली पोलिसांची धडक कारवाई

चिखली : अमली पदार्थांच्या अवैध साठवणुकीविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने इंदिरानगर परिसरातील एका घरावर छापा टाकून तब्बल २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे १ लाख ३ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नसीम शेख हसन शेख (वय ३६, रा. इंदिरानगर, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरुद्ध ‘मिशन परिवर्तन’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिखली पोलिसांचे डी.बी. पथक अमली पदार्थांबाबत मिळणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत आहे. दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी पोलिसांना इंदिरानगर परिसरातील नसीम शेख हा गांजा बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची पडताळणी करून पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, शासकीय पंच, अधिकृत वजन काटा धारक आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत नसीम शेख याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान घरातून २ किलो ६६ ग्रॅम गांजा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी गांजा जप्त करून नसीम शेख याला ताब्यात घेतले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अप. क्र. ७६६/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम २०(ब)(ii)(C) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!