मलकापूर : – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी घिर्णी येथे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गणेश मंडळे, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विविध सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव हा शांतता, एकोपा आणि सामाजिक बंधुभावाचा सण असून, उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गिरी यांनी केले. गणेश मंडळांनी आवश्यक परवानग्या घेणे, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे तसेच मंडपात विद्युत व अग्निसुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान हुल्लडबाजी टाळावी, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट, वादग्रस्त व्हिडिओ किंवा अफवा पसरविणारे संदेश पुढे पाठवू नयेत. गावात संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी स्वतः कारवाई न करता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगण्यात आले.
गावाच्या सुरक्षेसाठी CCTVचा निर्णय
ग्रामसभेत घिर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गावातील प्रमुख ठिकाणी येत्या सात ते आठ दिवसांत CCTV कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले. तसेच सोशल मीडियावरील अफवांना आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
बैठकीला गणेश मित्र मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, युवक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.