मलकापूर :- साहित्यसम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मलकापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाजघटकांसह महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केल्याचा साकारण्यात आलेला देखावा विशेष आकर्षण ठरला. या देखाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अण्णाभाऊंच्या शाहिरी आणि साहित्यिक कार्यातून शिवरायांचा विचार देश-विदेशात पोहोचल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
मिरवणुकीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध दीपक बँड (गलंगी) यांच्या वाद्यवृंदाने रंगत आणली. ढोल-ताशांचा गजर, बँडच्या तालावर तरुणाईचा उत्साह आणि महामानवांच्या जयघोषाने मलकापूर शहर दुमदुमून गेले.
यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक समता, बंधुता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश देत सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
मिरवणुकीत महिला व बालकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. उत्साहासोबतच शिस्त आणि सामाजिक एकोपा दिसून आल्याने यंदाची अण्णाभाऊ साठे जयंती विशेष ठरली.
आयोजकांचा सहभाग
या जयंती सोहळ्याच्या आयोजनात सागर तांबे, राजकुमार वानखेडे, महादेव अर्जुन तायडे, चंदनशिव, अजय चंदनशिव, यमुनाबाई भालेराव, आकाश बोरले, विनोद तायडे, ईश्वर बांगर, नितीन खंडारे, नितीन चंदनशिव, विजय तांबे, सागर वानखेडे, गणेश चंदनशिव, विठ्ठल हिवाळे, प्रमोद बांगर, आदित्य वानखेडे, संतोष बोरले, प्रेम चंदनशिव यांच्यासह संपूर्ण मातंग समाज, मलकापूर यांनी सहभाग घेतला.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन साजरा झालेला हा जयंती सोहळा सामाजिक एकतेचा संदेश देणारा आणि मलकापूरकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.