Headlines

टाकळी तलाव परिसरात रात्रीचा वीजपुरवठा खंडित; शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त

खामगाव : तालुक्यातील टाकळी तलाव परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या १५ ते २० दिवसांपासून रात्रीच्या सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या खंडिततेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळे निर्माण होत आहेत.
टाकळी तलाव परिसरात अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. मात्र रात्रीच्या वेळी वीज नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात जात आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, जंगली प्राण्यांची भीतीही नागरिकांमध्ये वाढली आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
शेतीच्या कामांसोबतच कुटुंबाची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रात्रीचा वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी टाकळी तलाव परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचीही चिंता दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!